
सद्गुरू स्वामी शंकरानंद
-: परम पूज्य स्वामी शंकरानंद - आत्मनिवेदन सार:-
साधकाला सद्गुरू-बोध लाभणे आणि तोच गुरुबोध आचरणात आणणे, या दोन अत्यंत वेगळय़ा बाबी आहेत. गुरुपरंपरेचा गुणगौरव आपण सततच करत असतो. परंतु, गुरूंचे जे बोधरुपी विचारधन आहे त्याचे उपयोजन आपल्या रोजच्या जीवनात अभावानेच घडते. या विरोधाभासामागील कारणही सोपे आहे. तुकोबांच्या शब्दांत सांगायचे तर ‘विष खावें ग्रासोग्रासीं’, इतके आचरण अवघड असते..!
साधकाने जर विविध गुरुबोधाची प्रचिती, आपण आपल्या अनुभवाच्या सहाणेवर घासून बघण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली तर दोन गोष्टी होतात.. एक म्हणजे, बोधाचे यथार्थ आकलन करून घेण्याच्या वाटा त्यामुळे रुंदावतात.. दुसरे म्हणजे मायारुपी जीवन संघर्षांत सद्गुरुंनी वापरलेल्या साधनांचाही आपल्याला परिचय होतो.
गुरुबोधाच्या वचनांचा अर्थ गुरूच्या जीवनचरित्राच्या प्रकाशात समजावून घेण्याचा प्रयत्न केल्याने होणारा सर्वात मोठा लाभ म्हणजे परमार्थ, अध्यात्म, भक्ती, गुरूत्व यांसारख्या संज्ञांचे गुरुसूत्राला अभिप्रेत असलेले अर्थ आपल्याला यथार्थपणे उमगण्यास मदत होते. आज गरज आहे ती गुरुबोध विचारांचे परिशीलन या भूमिकेतून आणि भक्ती, परमार्थ या पद्धतीने होण्याची.!
भक्तीची परिणती विवेकामध्ये व्हावी, विवेकाच्या रोखलेल्या अंकुशाखाली आपला प्रत्येक दिवस जागृतीचा असावा अशीच गुरूंची अपेक्षा आहे.. ‘तुका म्हणे मना पाहिजे अंकुश। नित्य नवा दिस जागृतीचा।।’ गुरुप्रणीत भक्ती ही अशी आहे.! एकीकडून तिला नीतिमत्तेचे अस्तर जोडलेले आहे आणि तिची परिणती विवेकामध्ये घडून येणे अपेक्षित आहे.. ‘भक्तीचिया पोटी बोध कांकडा ज्योती’, भक्तीच्या पोटातून बोधाचा जागृत-अर्थ जन्मावा, ही अपेक्षा आहे.. त्याच विवेकाच्या प्रकाशात भक्तीचा प्रांत उजळून निघावा, हेच गुरुतत्वाला अभिप्रेत आहे..
सद्गुरूतत्व गुरुबोधाची सूत्रमय मांडणी करत असते.. गुरु-शिष्य संवाद हा साधनवृद्धीचा भाग, त्यांतील गुरुबोध भक्तिसूत्र वापरून जाणून घ्यायला हवा.. आपल्यापैकी प्रत्येक गुरुबंधूने अंतर्मुख होऊन, आपण गुरुकडून जे जे काही शिकलो त्या प्रमाणे आपण स्वत: वागतो आहोत का, आपल्यातलं. शिष्यत्व सतत जागतं आहे का..? असे आत्मपरीक्षण करणे महत्वाचे..!
स्वामीजी म्हणत.. नुसते खंडीभर वाचन होतेय, पण गुरु अनुग्रहित साधना शून्य होत असेल तर ती व्यक्ती केवळ 'वाचक' बनेल, 'साधक' नाही..! आध्यात्मिक वाचन हे केवळ एक प्रेरणा मिळावी, दिशा कळावी, गुरु अनुसंधान रहावे, मनावर चांगले संस्कार व्हावेत एवढ्यापुरतेच मर्यादीत असावे.. योगशास्त्रात 'सिद्धांतवाक्य श्रवणम' असा एक नियम आहे.. तो याच अर्थी आहे..
आज सद्गुरू स्वामी शंकरानंदजी यांनी प्रदान केलेल्या अनुग्रहित साधनेने, आपणास लाभलेल्या मानवी जन्माचे सार्थक करून घेण्याची आस.. हेच सर्व अनुग्रहित साधकांचे प्रथम ध्येय असले पाहिजे. हीच खरी श्री सद्गुरू स्वामी शंकरानंदजी यांना गुरुदक्षिणा होईल. असा हा आपल्या सर्वांचा ध्येय उद्देश सद्गुरुकृपेने सिद्धीस न्यावा अशी गुरु-प्रार्थना करुन श्रीगुरुचरणी आपली सर्वांची सेवा समर्पित करुया..! ॐ श्री गुरुदेव दत्त...