swami_image

सद्गुरू स्वामी शंकरानंद

-: नित्य गुरुबोध चिंतन-पाठ :-

  1. गुरुचे मूळस्वरूप तत्वरूपी आहे, या तत्वाशी आपण जितके एकरूप होऊ तितकी आनंदप्राप्ती ठरलेली..
  2. सद्गुरू जो मार्ग सांगतील, त्याच वाटेने जावे.. मार्गक्रमण करताना मधेच दुसरी वाट कधीही धरू नये..
  3. साधकाला सगुण रूपातील गुरुभक्ती साध्य झाल्याशिवाय निर्गुणातील मर्म पूर्णार्थाने काळात नाही..
  4. गुरुतत्व हे अविनाशी आहे.. अशा गुरुतत्वाचा बोध प्रचार आणि प्रसार करणे हे शिष्याचे कर्तव्य आहे..
  5. सद्गुरू कृपासिद्ध असतात, पण कृपा ग्रहण करण्यास शिष्य चित्तशुद्धीने समर्थ असला पाहिजे..
  6. आपल्या गुरूशी आपले सातत्यपूर्ण अनुसंधान असेल तर निश्चितपणे योग्यवेळी कृपा हि होतेच..
  7. सांसारिक जगतात साधना होणे म्हणजे आत्मबुद्धीने देहबुद्धीवर केलेली मातच आहे..
  8. सद्गुरू संगत असता साधन होते, इतरवेळी नाही.. यासाठीच स्वामी स्वरूपानंद म्हणत, साधकाच्या जीवनी आत्मपरीक्षण फार महत्वाचे..!!
  9. गुरूने अनुग्रह, साधक होण्यासाठी दिला आहे, सेवेकरी होण्यासाठी नाही, गुरु अनुग्रहित साधनेचे सातत्य हीच गुरुसेवा..
  10. अनुग्रहित सोहं साधनेला ज्ञानेश्वरी अभ्यास चिंतनाची जोड दिल्यास साधकाची प्रगती लवकर होते..
  11. गुरुस्मरण समर्पित भावशुद्धीने नित्य होत असता साधना पूरक कृती आपोआप होत जातात..
  12. साधकाला साधनेचे अनुसंधान लाभत असेल तर ते सुटू न देण्यावर भर असावा..
  13. अनुसंधान सुटू नये, याकरिता निश्चयात्मक बुद्धीने गुरुबोध चिंतन मनन वारंवार करावे..
  14. साधकाने चालता-फिरताना वा प्रवासात एखादी ओवी-श्लोक लिहिलेला कागद जवळ ठेवावा.. १५-२० मिनिटांनी परत परत वाचावा व त्यावर चिंतन-मनन करावे.. अशाने साधनेचे अवधान प्राप्त होते..
  15. जशी संगत तशी गत होते, अनुग्रहीताने सोहं साधनेच्या संगतीने आत्मज्ञान गती प्राप्त करावी.
  16. निश्चयात्मका बुद्धीने गुरुप्रदित साधनेचे बंधन स्वीकारल्यास ते कधीही त्रासदायक होत नाही..
  17. आपल्यात दुर्गुणांचा शिरकाव न होण्यासाठी पराकाष्ठेने काळजी घेणे हा दैवी सद्गुणच आहे..
  18. श्रद्धापूर्वक गुरुभक्तीनेच साधनेप्रती प्रेम वाढून इतर आसक्ती कमी होत जातात.. विरक्ती जाणीव होते..
  19. षड्रिपूंचा पारमार्थिक विचाराने वापर केल्यास ते साधनापूरक होऊ शकतात, मात्र यासाठी अभ्यास महत्वाचा..
  20. आपण ध्येय ठरविण्याऐवजी, आपले जीवनाचे ध्येय गुरूने ठरविले तर याहून भाग्याची गोष्ट कोणतीही नाही..
  21. सद्‍गुरूंचा अनुग्रह प्राप्त होणे हा एक सूत्रमय योग आहे.. याचे सूत्र संचितात दडलेले असते..
  22. पारमार्थिक प्रवास गुरुकृपेने सुरु झाला, पण अध्यात्मिक अनुभूती येणे, साधकाच्या ग्रहणशक्तीवर अवलंबून असते..
  23. साधकाला अज्ञानाचा अंधकार ज्ञान प्रवासाला सुरुवात झाली कि जास्त जाणवू लागतो, अशावेळी गुरुस्मरण हाच उपाय..
  24. उत्कट सात्विक कर्म, भक्ती किंवा पुर्व-पुण्याई मुळे जागृत शक्तीसूत्र सुनियंत्रीत गुरूकृपेने मनुष्यास अनुग्रह प्रदान करते.. अनुग्रहित शिष्याने देखील गुरू हा आपले सर्वस्व समजुन पुजा करावी.. सदगुरुरूपी भगवंतांकडून प्राप्त झालेले सर्वश्रेष्ठ वरदान म्हणजे अनुग्रहित साधना होय..!
  25. नित्य गुरुस्मरणाने साधकाचे मन अंतर्मुख होते.. 'मी' चे स्फुरण लोपून, मनातील विचारांची गती आणि प्रमाण कमी होत जाते.. हळू हळू देहभाव विरून, आत्मभाव जागृती होते..
  26. अंतरातील आत्मत्व जाणून, सगुणात स्वरुपत्व निर्माण करणे म्हणजे प्रपंचात राहून परमार्थ करणे होय..!!
  27. साधना होत असताना स्थूलातून सूक्ष्माचा प्रवास शक्तीरूपाने होतो, हा आभास म्हणजेच आत्म-जाणीव..!
  28. साधकाच्या मनाची निश्चल आध्यात्मिक स्थिती व ध्येय गाठण्याची तळमळच त्याला सुदूर ध्येयाप्रत नेऊ शकते..
  29. सोहं साधनेत भक्ती, ज्ञान आणि कर्म परिपूर्णतेने समाविष्ट होते.. गुरुप्रति असलेला समर्पित भक्तीभावच साधनेचा मार्ग सुलभ करीत जातो..
  30. आपल्या अंतःकरणात वसणाऱ्या दैवत्वाच्या प्रतिभेला व्यक्त करण्यासाठीच हा जन्म मिळाला आहे, असे समजावे..
  31. कर्मामागील विचार किंवा ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तेव्हा साधकाने निश्चयात्मक बुद्धी प्राप्त करून घेऊन शांती मिळवण्याचा प्रयत्न करावा, जेणे ज्ञानयोग साधला जाईल..
  32. आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार अनुभव कसा घेता येईल हे सांगणं हा ज्ञानेश्वरी तत्त्वज्ञानाचा पाया आहे..
  33. साधनेने देहबुद्धीचा जसजसा निरास होतो तसतशी स्थूल बुद्धीची जागा सूक्ष्म अशी प्रज्ञाशक्ती घेऊ लागते, हि अनुभूती महत्वाची..
  34. साधना - अभ्यास आणि गुरुकृपा जेव्हा एकरूप होते, तेव्हां गुरुतत्व शिष्याकडे आल्याशिवाय रहात नाही.. आणि पुढे केवळ गुरुमय प्रवास हीच साधना..!!
  35. सद्गुरुंनी प्रदान केलेली अनुग्रहित साधना स्थलकालाच्या पलीकडे असते.. याचे मर्म साधकाला विशिष्ट टप्प्यावर कळते..
  36. प्रवासात, वाहनात, चालताना-फिरताना देखील सोहंस्मरण/गुरुचिंतन घडले म्हणजे ते स्थलकालाच्या पल्याड आहे असे म्हणता येईल.. हाच अभ्यास पाहिजे..
  37. मायारूपी संसारात 'मी' ला बाजूला सारून तेथे सुत्ररूपी परम-तत्वाला ठेवले की आत्मरूपी मार्ग उजळून निघतो.. 'मी' च्या ठायी गुरुसाक्षी भाव विराजमान झाला की गुरुकृपाछत्र लाभून जीवन ही साधना बनते..
  38. अस्थिर-भासमान जीवनातील आनंद क्षणभंगुर असतो, कालांतराने यापासुन आपण दुरावले जाणार याची जाणीव म्हणजेच आत्मभान होय..!
  39. दुसऱ्यांना आध्यत्मिक जीवन जगताना बघुन आत्मज्ञानाचा अर्थ समजत नाही.. तर त्यास स्वतःच जगल्यावर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात..
  40. लाभलेल्या जीवनांतील हरेक गोष्ट परमतत्वी सुत्र करते, अशी श्रद्धा/भाव धृढ करता आला तर मन नक्कीच शांत/निशंक/ निश्चल होईल..
  41. साधनेच्या प्राथमिक स्थितीत थोडी बळजबरी हवीच.. साधनेचे सातत्य आणि ध्यान सहवास प्रथम हट्टानेच होईल..
  42. आपले बाह्यरूप कसेही असले तरी, अंर्तरूपाचे सौंदर्य नक्कीच अद्वितीय असे आहे, मात्र ते पाहण्यासाठी अंतरंगात खोलवर उडी मारावी लागते..
  43. साधकाने मनी कोरावे.. आत्मकल्याण, आत्महिताच्या प्राप्तीसाठी गुरु अनुग्रहित साधनेची एकनिष्ठता फार महत्वाची..
  44. स्वामी स्वरूपानंद सांगत, आत्मज्ञानी होणे प्रत्येक मानवाचा स्वधर्म आहे.. किमान अनुग्रहित साधकाने तरी तो प्रयत्नपूर्वक पाळायलाच हवा..!!
  45. अज्ञानानं जगणं थांबवायचं असेल तर सद्गुरूंच्या बोधाच्या वाटेवर दृढ पावलं टाकलीच पाहिजेत.. यासाठी बोधावर श्रद्धापूर्वक धृढ विश्वास पाहिजे, तरच ज्ञानप्राप्ती होईल..
  46. आत्मज्ञान होण्यास लागणारी शक्ती प्रत्येकाच्या अंतर्यामी असते. पण फारच थोडेजण तिचा विकास पूर्ण क्षमतेने करतात.
  47. साधकाला नुसते वाचून ज्ञानप्राप्ती होत नसते, ते अंगी चिंतन-मननाने मुरवावे लागते..
  48. आपल्या जीवनातील दुखः, खरे सुख कशात हे नेहमीच दर्शवित असते.. गुरुबोध अभ्यासा झाल्यास याची सत्य जाण येते..
  49. ज्ञानप्राप्ती होताना होणारी अज्ञानाची जाणीव, काहीवेळा आपण हे आधी का केले नाही, असे नैराश्य उत्पन्न करते.. ज्ञानमार्गातली या अडचणीच्या गतिरोधकाला पार करून जो पुढे जातो त्यालाच यश मिळते..
  50. कर्म करीत असतांना गुरु अनुसंधान अबाधित राहिले तर गुंतणे होत नाही, देहबुद्धीच्या पकडीतून साधकाची सुटका होते..
  51. ज्याला सुटका पाहिजे त्याने तळमळीने गुरूने सांगितलेल्या मार्गावर कितीही अडथळे आले तरी चालत रहावे..
  52. अनुग्रह मिळाला, पण फक्त गुरु तुमच्या आयुष्यात येऊन तुमचा लगेच उद्धार होणार नाही, हे प्रत्येक साधकाने लक्षात ठेवावे.
  53. जीवनात जो वेळेला जाणतो, त्याची किंमत करतो.. तो गुरुकृपेने नक्कीच स्वःताला योग्यवेळी ओळखतो..
  54. आजचा क्षण प्रतिध्वनी स्वरूपात भविष्यकाळात प्राप्त होतो.. आजचा अभ्यास उद्याची कृतार्थता असू शकते..
  55. गुरु, साधना आणि चिंतन यावर जेवढी श्रद्धा-विश्वास असेल, तेवढीच आत्मजाणीव आपल्याला जाणवेल..
  56. आत्म नियंत्रण आणि आंतरिक शुद्धता काही अनुभूती देतात.. मात्र आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी ध्यान आणि अनुसंधानी चिंतन महत्त्वाचे आहे..
  57. सोहं ध्यान हे मनपवनाची गाठ घालून सामान्य अध्यात्मिक चेतना ओलांडण्याचे साधन आहे..
  58. गुरुभक्तीला चिकटून राहिले असता साधनेची एकरूपता सहज साधली जाते..
  59. सोहं साधना करताना मन-पवनाची वाट सापडते.. मनाचा अभ्यास हि साधनेची प्रथम पायरी साधक चढतो.. याचा योग्य अभ्यास होताच अहंकार लोपून मन-पवनाची गगनाशी गाठ बांधली जाते..
  60. मनानंच निर्माण केलेल्या, मनानंच जपलेल्या आणि जोपासलेल्या भ्रम-मोहाचं निर्दालन मनच करू शकतं..!
  61. ज्या साधकाला समर्पणाची कला साध्य होते, त्याचे जीवन साधनेच्या मार्गात सुगंधी बनून जाते..
  62. मनात सदोदित सुरू असलेलं भौतिकाचं अनुसंधान शुद्ध सत्संगानंच सुटतं.. गुरुस्मरण, ध्यान, ज्ञानेश्वरी चिंतन-मनन-निधिध्यास असा सत्संगच साधकास तरुन नेतो..
  63. आत्मज्ञानाच्या मार्गावर नीतिविचारही मुख्य आहे, नीतीला भक्तीची जोड हवी.. 'गुरुभक्तिहीन नीती ही अनीतीच होय'..
  64. सद्गुरू बोधाचे पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती’ साधकाला लाभतेच.
  65. गुरुप्रती परिपूर्ण श्रद्धा असलेले साधक जीवनात कितीही दु:ख आले तरी डगमगत नाहीत. त्यांनी अंगिकारलेली नैतिक जीवनाची वाट सोडत नाही. त्यांची कोणी निंदा करोत वा स्तुतिसुमने वाहोत, त्याने ते हुरळून जात नाहीत. धनसंपदा आली किंवा गेली तरी खेद वा आनंद मानत नाहीत. काळाचा घाला लवकर आला किंवा वार्धक्य येईपर्यंत जीवन गतिमान राहिले तरी सन्मार्ग व सत्य सोडत नाहीत. कारण सुख आणि भोग हा जीवनहेतू त्यांचेसाठी राहत नाही. आत्मस्वरूपी संग हेच ध्येय असते.
  66. साधकांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, साधनेत लगेचच दिव्य अनुभव येतीलच असे नाही. अनुभव येणे न येणे हे तुमचे मन व शरीर किती प्रमाणात शुद्ध झाले आहे व तुम्ही किती भक्तिभावाने व तळमळीने साधन केले यावर अवलंबून आहे. सुरवातीचा काही किंवा बराच साधन काळ हा मन व शरीर शुद्ध होण्यातच खर्ची पडतो. साधकांनी या गोष्टी नीट लक्षात ठेवून अनुभव येण्याची घाई करू नये. साधना करावी असे वाटणे हा देखील एक अनुभवच आहे.
  67. साधना होत असताना, आपण जे करतो, त्यावर पूर्ण श्रद्धा हवी आणि गुरुबोधी तत्व व गुरू यांचेवर पूर्ण श्रद्धा हवी. साधनेत रोज मन व चित्ताचे निरीक्षण करावे. याने मनातील चित्ताचे दोष जातात. विकारांचे उपशमन होते. साधना करताना सत्पुरूष वा सद्गुरूंच्या शब्दांवर श्रद्धा हवी, ते ऐकून आचरण करावे. माझ्या मनाला, बुद्धिला पटत नाही ते मी करणार नाही ही दर्पोक्ती असू नये. साधकाने जाणावे, संत-सत्पुरुषांच्या शब्द सामर्थ्याने मन, बुद्धी चित्तातील दोष नष्ट होतात..
  68. आत्मस्वरूपी ज्ञानासाठी आत्मबळ पाहिजे.. आत्मबळ म्हणजे आपल्या धृढ निश्चयासाठी शारीरिक वा मानसिक कष्ट, वेदना किंवा दुःख सहन करण्याची क्षमता.. शारीरिक बळापेक्षा आत्मिक बळ हे अधिक श्रेष्ठ असते..
  69. केळे खाण्याआधी सोलावे लागते, मगच आतील गोड गराचा स्वाद घेता येतो.. केळे देणारा न सोलताच ते देतो,केळे सोलून खाण्याची जबाबदारी केळे घेणाऱ्याची नाही का..? अनुग्रह हि असाच आहे.. गुरुकरवी प्राप्त तर झाला पण आतील गोड गर खाण्यासाठी सोलण्याचे कष्ट शिष्यालाच घ्यावे लागतील..
  70. साधकाचे मन जितके शुद्ध होईल तितकी देहबुद्धी लोपून आत्मबुद्धी प्रबळ होत जाते..
  71. सद्गुरूंच्या साक्षीभूत भक्तियोगात तत्वज्ञान अभ्यास परिपूर्णतेने समजून येतो..
  72. मी कोण असे, जीवनाचे सार जाणण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात साधकाला जी अनुभूती येते, तीच प्राप्त जीवनाचे खरे मोल शिकवून जाते..
  73. गुरु फक्त मार्ग-खुणा सांगतो, शिष्य साधकाने अभ्यासाने त्या ओळखायच्या आणि आपला उद्धार करायचा.. स्वयें कष्टल्यावीण का होतो कोठें आत्मोद्धार || हे लक्षात ठेवावे..
  74. अनुग्रहीताने श्रद्धापूर्वक धृढ विश्वासाने नियमित साधना केल्यास सुदूर ध्येय निश्चितच दृष्टीपथास येते..
  75. तत्त्वबोध होत नाही तोवर जास्तीचा अभ्यास महत्वाचा, साधकाकडे चिकाटी हा गुणधर्म पाहिजेच..
  76. आजुबाजूला चित्रविचित्र गोष्टी घडत असताना, अलिप्तपणे साधना होणे म्हणजे साधकी वृत्तीचा विजय होय..
  77. साधकाने नित्य चिंतन साधले तर हा देह म्हणजे मी नाही, मी कोणीतरी वेगळा आहे, वेगळा म्हणजे मी तो आहे, म्हणजेच सोsहं हे दृढ होत जाते.. असे नित्य चिंतन पाहिजे..
  78. गुरुचरणी सर्वस्वार्पण होऊन, स्वतःचे संपूर्ण समाधान होऊन अनुभव आचरणात उतरला म्हणजे तो स्वानुभव खरा असे म्हणण्यास हरकत नाही, अशी आत्मानुभवाची भाषाच खरी होय..!
  79. गुरुप्रणीत साधनेने साधकाला आत्मप्रत्यय येणे हीच पारमार्थिक अनुभवाची सर्वात मोठी कसोटी आहे..
  80. साधकाने ‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ हे स्मरणी ठेवावे.. यासाठी गुरु-भक्तिसूत्र जाणून गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल, मात्र गुरुकृपेसाठी साधना हवी.
  81. आत्मस्वरूप जाणणे हे साधनेचे साध्य असले तरी गुरुसाक्षी अवस्था प्राप्त होणे ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनधन्यता त्यातच आहे.
  82. अनुग्रह लाभूनही काहीवेळा रोजच्या जगण्यात साधक कसेही जगतो. पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे..
  83. साधकाकडे शिकण्याची वृत्ती, ग्रहण करण्याची शक्ती हवी, इतरांकडून चांगले गुण ग्रहण केले कि आपसूक आपल्यात परिवर्तन होत जाते..
  84. गुरु ज्यावेळी साधक शिष्याशी संवाद साधतो, तेव्हा त्यात प्रवाही असे तत्वज्ञान असते. साधनेचे सार लपलेले असते. मात्र अभ्यास झाला, तरच त्याची जाणीव निर्माण होते..
  85. 'मी' ची दोन अंगे आहेत.. शिव आणि शक्ती.. शिव स्थित आहे, शक्ती गतिमान आहे.. शक्ती देहादिक कर्म करते, साधना शक्तीला शिवाकडे वळवते.. यातूनच मी कोण हे उलगडते..
  86. प्राथमिक अनुग्रह हा साधकाचा साधना प्रवास सुरु होण्यासाठीच असतो.. असा अध्यात्मिक प्रवास चालू झाला कि भक्तीमार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्ग हळू हळू मोकळा होत जातो..
  87. आपल्याला साधक व्हायचे आहे तर सुरुवात सदाचाराने करावी. जेथे स्वार
  88. प्रत्येक साधकाने जमेल तशी साधी सरळ आपल्या कुवतीने साधना करत राहायचे, यात सातत्य असेल तर नक्कीच प्रगती होत जाते. उगाच उन्नती होईल का कि नाही, असा संभ्रम बाळगू नये. मनाचे खेळ रंगवण्यापेक्षा थोडीशी का होईना रोज साधना केलेली बरी..
  89. काही वेळेस एखाद्या छोट्या गोष्टीमुळे, अहंकारामुळे किंवा मायेत अडकल्यामुळे प्रगती थांबली असल्यास एखाद्या सत्पुरूषाकडून मार्गदर्शन मिळते आणि पुनश्च साधनेला गती मिळते. हे सारे सूत्र संकेतानुसार आपसूक घडत असते.
  90. एकदा का साधनेची अक्षर ओळख झाली की वाचता येते. गुरुमार्ग अभ्यासपूर्वक वाचता येऊ लागला कि चिंतन व मनन सुरु होते.. यातून मार्गाची ओळख होत जाते.. साधकाने लक्षात ठेवावे, सुरुवात सगूण भक्तीने म्हणजे गुरु प्रेम भक्तीने पुजेने होते, शेवट ध्यान स्वरूपी निर्गूणाने होते.
  91. अनुग्रहित साधक असाल तर रोजची थोडी का असेना पण साधना हवीच.. अशी साधना शिष्याकडून झाली कि गुरु तृप्त व प्रसन्न होतो आणि अंतरातील आत्मभाव हळूहळू प्रकट होत जातो.. असा आत्मभाव तुमच्यातील
  92. जीवन गतिमान आहे, बदलत जाते.. प्रत्येक क्षण महत्वाचा हा सिद्धांत साधकाने लक्षात ठेवावा, तरच आपल्यात योग्य तो बदल होतो..
  93. साधकाने गुरु अनुग्रहित सोहंम साधना एकांतात करावी. सामुदायिक साधना वगैरे उत्सव वा पारायण सत्संग यावेळी थोडावेळ झाली तर ठीक आहे. प्रत्येकाची प्रभा वेगळी असते, त्यामुळे नित्य साधना एकांतातच करावी.
  94. साधनेत मनाचे आणि अंत:करणाचे अंतरंगी परीक्षण फार महत्वाचे, अंतर्मुख होऊन आपल्यातील दुर्गुण ओळखून ते दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.
  95. जन्माला कशासाठी आलो, कुठल्या तरी संप्रदायात कशासाठी आलो आहोत, याचा पहिला विचार केला पाहिजे.. कितीतरी जन्म आपले असेच देहादिक अहंकारापायी वाया गेले आहेत. अहंकार घालविण्यासाठी आपण इथे आलेले आहोत, हे स्मरण ठेवावे..
  96. सांप्रदायिक साधना होत असताना विविध अनुभव येतात. एखादा अगम्य अनुभव आला तर साधकाने घाबरू नये, साधना करणे सोडू नये. सुखदायी अनुभव आला तर पुन्हा तोच अनुभव हवा असे नको. अनुभव येतात आणि जातात. आपली साधना करीत राहणे हेच हिताचे.
  97. जर मन एकाग्र होत नसेल तर त्याविषयी जास्त विचार न करता, आपले साधन नियमितपणे सुरूच ठेवावे, हे सर्वात चांगले. हळू हळू एकाग्रता वाढून साधनात सहजता येते..
  98. भक्ती आणि ज्ञान नाण्याच्या दोन बाजू. कधी ज्ञानातून भक्तीचा वा भक्तीतून ज्ञानाचा उदय होतो. नित्य साधन भक्ती-ज्ञानाने मन तदाकार होऊन आत्मस्वरूपी अंतरंगात शिरते. चिंतनात मग्न होऊन साधक स्वतःला संपूर्णपणे विसरतो, हाच स्वानंदानुभव हे भक्तीचे ज्ञानमय फळ आहे.
  99. जे कधीच टिकणार नाही त्याचे केवढे ओझे घेऊन आपण जगतो आहोत, ते ओझं बाजूला सारलं कि स्थूलत्वाचा प्रवास सूक्ष्माकडे होतो..
  100. जर आपण आध्यात्मिक प्रगती करत आहोत असं वाटलं, तर किती दर्शनं झाली किंवा किती विविध प्रकारचे प्रकाश दिसले, असेअध्यात्मिक प्रगतीचं मोजमाप करू नका. आपण कसे वागतोय, आपल्या वर्तनात बदल झाला आहे का हे तपासून पाहिले पाहिजे. अहंकार मुख्य विषय.. माझा स्वार्थ कमी झाला आहे का? माझे जग, माझी प्रवृत्ती संकुचित झाली आहे की माझा दृष्टिकोन, माझी विचारसरणी व्यापक झाली आहे.? मी इतरांची काळजी करतो, का ती आत्मियता, ते प्रेम फक्त माझ्या मुलांसाठीच वा कुटुंबासाठी आहे.?
  101. साधकाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे भीती.. मुक्तिच्या मार्गावरची पहिली पायरी निर्भयता आहे.. अयोग्य विचाराने भरलेले मन भीती वाढवत जाते.. या अयोग्यतेचे रूपांतर सुयोगात करणे साधकाला संभव आहे.. कारण सर्व भय आणि संभ्रम हे प्रत्यक्ष अनुभवामुळे दूर होतात, मात्र त्यासाठी गुरुप्रती श्रद्धा आणि साधनेची शक्ती आवश्यक असते..
  102. योग्य-अयोग्य अशा सांसारिक गोष्टी प्रारब्धाने घडतच असतात. यासाठी साधकाने परमार्थ विचारात राहावे, सद्बुद्धी राहील हे पाहावे, सत्कर्म, सदाचारांनी दृढता ठेवली, तर प्रारब्धाने आलेल्या संकटाचे निराकारण होऊ शकते..
  103. जेवढे साधकाचे गुरुशक्तिप्रति समर्पण अधिक, तेवढी साधकाची साधना समृद्ध होत जाते व साधनेत स्थिरत्व प्राप्त होते, हळूहळू कालांतराने साधनेतून प्राप्त होणारा अत्युत्कट आनंद आपल्या व्यक्तिमत्वातुन जाणवू लागतो.
  104. कोणत्याही परिस्थितीत, जीवनाचे नैराश्य घालवून चैतन्य उत्पन्न करणारी.. अभंग ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी आहे आणि साधकाने ती अभ्यासाने अनुभवावी..
  105. इतर कोणत्याही ज्ञानापेक्षा अनुग्रहित साधनेने लाभणारे परमात्मतत्वी निरंजन आत्मज्ञान श्रेष्ठ आहे..
  106. अर्धवट सत्य हे सत्य कधीच नसतं. खरं ज्ञान बोलण्यातून नव्हे तर असण्यातून–वागण्यातून व्यक्त होतं. नुसते हे मला आधीच माहित होते/आहे म्हणजे ज्ञान नाही. अशा ज्ञानाने मनात अहंकार निर्माण होतो, तो पुढे साधनेत अडथळे निर्माण करतो. अध्यात्माच्या मार्गावरून चालताना लीनता आणि नम्रता अत्यंत आवश्यक आहे. कोणताही विषय माहित असण्यापेक्षा ज्ञानपूर्वक कळणे महत्वाचे..!
  107. सांसारिक साधकाने नाउमेद न होता साधना केल्यास, जस जशी साधनेत प्रगती होते तशा काही गोष्टी आपोआप सुटतात. विविध वेळी हे करू का ते करू हा संभ्रम साधनाच दूर करते.. सूत्र संकेताने सांगते की तुम्ही सद्य परिस्थितीला काय करायला पाहिजे..
  108. सद्गुरू तत्वरूपी असतात.. देह सोडला तरी सद्गुरु कधीही जात नसतात, ते सदैव व्यापक रुपात आपल्या बरोबरच असतात..!!